भारतीय नाटकासाठी महात्मा गांधी नवीन नाहीत. अजित दळवी, प्रेमानंद गज्वी, रामू रामनाथन, प्रदीप दळवी या नाटककारांनी महात्मा गांधीच्या बहूआयामी व्यक्तिमत्वाला आपल्या लिखाणातून आपापल्या परीने मांडलेले आहे. गांधीजींबद्दलची नाटके एकमेकांपासून वेगवेगळी आहेत कारण गांधीजींकडे पाहण्याचे या नाटककारांचे दृष्टिकोनही वेगवेगळे आहेत. अजित दळवींच्या गांधी विरुद्ध गांधी या १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या नाटकात गांधीजी अपयशी वडील म्हणून येतात. त्या आधीच्या, १९८९ मधल्या मी नथुराम बोलतोय या नाटकात उजव्या विचारसरणीच्या नजरेतून फाळणीला जबाबदार म्हणून नथुराम गोडसेंसमोर गांधीजी उभे केले जातात. प्रेमानंद गज्वी यांच्या गांधी आणि आंबेडकर या राजकीय नाटकाची मांडणी गांधी आणि आंबेडकर यांच्यामधील वैचारिक संघर्षावर ते उभारलेली आहे. तर, रामू रामनाथन लिखित महादेवभाई हे नाटक गांधीजींबरोबर दीर्घकाळ काम केलेल्या आणि त्यांच्या सहवासात राहिलेल्या महादेवभाईंच्या नजरेतून गांधीजींकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देते.

पैकी, गांधी विरुद्ध गांधी हे नाटक महात्मा गांधी, त्यांची पत्नी आणि त्यांची चार मुले या व्यक्तिरेखांभोवती गुंफलेले आहे. नाटकातला मुख्य मुद्दा तसा एक जुनाच मुद्दा आहे: आईवडील आणि मुलातील नातेसंबंध. पण, आई-वडील जगभरातील एक प्रसिद्ध, विचारवंत आणि प्रभावी स्त्री-पुरुष असताना नाटकाची मांडणी वैशिष्ट्यपूर्ण असणे यामुळे मुद्दा जुना असला तरी तो व्यामिश्र, महत्वाचा आणि लक्षात राहणारा बनतो. पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याने मुलाला आपल्या मनाप्रमाणे फुलता न येण्यातील अस्वस्थता यातून या नाटकाचा भावनिक अवकाश उभा राहतो. नाटकातून दोन मुख्य चरित्र – नाट्ये संभवतात. एक, आपल्या मुलाला नात्यासाठी गरजेचा असणारा पुरेसा अवकाश देण्यात अपयशी ठरलेल्या गांधीजींसारख्या मानवी समाजावर मूलगामी प्रभाव टाकणाऱ्या वडलांचे चरित्र-नाट्य. आणि दुसरे दुसरे चरित्र-नाट्य, वडलांचे लक्ष आपल्याकडे जावे यासाठी धडपडणाऱ्या आणि वेगवेगळ्या घटकांच्या अपेक्षांचे ओझे वाहून नेणाऱ्या मुलाचे. दिनकर जोशी यांच्या कादंबरीवर आधारलेल्या नाटकातील चरित्र-नाट्य निर्मितीत नाटककार अजित दळवी यांनी वर्तमानपत्रातील बातम्या, दोघांमधला पत्रव्यवहार, स्वप्नदृश्ये, प्रार्थना, डोहाळजेवणाचा विधी, लोकांसमोरचे व्याख्यान अशा प्रकारच्या साधनांचा तसेच नाट्य-तंत्रांचा वापर केला गेला आहे.
नाटकातील हरिलालना स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतंत्र शिक्षण घ्यायचे आहे, स्वतःच्या नजरेतून जग पाहायचे आहे आणि चुका करत मोठे व्हायचे आहे. पण, त्यांना वाटते की वडील आपल्या स्वप्नांना फुलू देत नाहीत. तर, आपल्या हाताखाली आपल्या मुलाने शिकावे आणि लोकांची सेवा करेल असा विचार करणाऱ्या गांधीजींना स्वतःच्याच कुटुंबाशी केलेली वागणूक क्रूर समतेची आहे अशा टीकेचे धनी व्हावे लागते. कुटुंबातील सर्व घटकांना एका कुटुंबाचा भाग मानतात पण प्रत्येकाला स्वतःचे आस्तित्व आहे हे नाकारण्याचा त्यांच्या वृत्तीचे दर्शन नाटकात घडते. मुलगा आणि वडलांमधल्या नात्याच्या संघर्षांतून उभा राहणारा नाट्यावकाश दोघांपुरता न राहता तो वडील, मुलगा आणि आई या नात्यांमधील तरलतेत विस्तारतो आणि विसावतो.
नाटकाची सुरुवात आणि शेवट गांधीजी आणि हरिलाल यांच्यातील दृश्याने होतो. दोन दृश्यांच्या मध्ये, या दोन अंकी नाटकात, जे नाटक घडते ते “आयुष्यात आपल्याला काय साधतं यापेक्षा आपण काय साधण्याचा प्रयत्न केला” यामधे गुंफलेले आहे. चक्राकार रचना-सूत्राची बांधणी करत हरिलाल आणि बापू या दोन पात्रांमध्ये नाट्यात्म अवकाश उभा राहतो. नाटकातील व्यक्तिरेखा आपले स्वत्व सोडत नाही. आपापल्या परीने प्रत्येक व्यक्ती स्वतःचा शोध घेत राहतात. गांधी विरुद्ध गांधी हे नाटक म्हणजे कागदावर टिपलेल्या — चार मुले, आई आणि वडील यांना दर्शविणाऱ्या — बिंदूंची कल्पना करता येईल. नाटकातील प्रत्येक दृश्य यातील एक किंवा काही बिंदू एकमेकांसमोर आणून घडते. ज्या कागदावर हे बिंदू रेखले आहेत तो कागद पांढरा शुभ्र नाही. तर, राखाडी रंगाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा आपापला काळ-अवकाश, बदलता सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्य, गांधीजी नावाच्या जगभर मान्यता पावलेल्या या व्यक्तीची वलये इत्यादी रेखाटनांनी भरून गेलेला कागद आहे. कागदावर टिपलेले सर्व बिंदू स्पष्टपणे दिसतील असे नाही. रचनेच्या आणि आशयाच्या अंगाने आणि नाट्यात्म संघर्षाच्या दृष्टिकोनातून गांधीजी आणि हरिलाल हे दोन बिंदू मात्र ठळक.
गांधी विरुद्ध गांधी या नाटकाची सुरुवात आणि शेवट मृत व्यक्तिरेखा बोलण्याच्या या क्लुप्तीतुन होतो. ही क्लुप्ती प्रामुख्याने शोकनाट्यातून दिसून येते. शेक्सपिअरच्या नाटकातून ती विशेष प्रसिद्धीस पावलेली आहे. जे एल ऑस्टिन या प्रख्यात विचारवंत आणि लेखकाने लिहून ठेवले आहे की भाषण फक्त बोलत नसते तर ते ‘कृती’ करत असते. बोलण्याच्या कृतीतून विशिष्ट असे नाट्यमय सादरीकरण होत असते. ऐकणाऱ्यावर एक खास प्रभाव पाडण्याची क्षमता बोलण्याच्या कृतीत असते. मृत व्यक्तीने बोलण्याची कृती म्हणजे ती व्यक्ती व्यक्ती शारीर अर्थाने मेली आहे हे सांगण्याऐवजी त्या व्यक्ती ‘अजून’ जिवंत असण्याबद्दलचे नाट्यमय सादरीकरण त्या बोलण्यात असते.
दोन मृत व्यक्तींनी आपापल्या आयुष्याची उजळणी करण्याच्या नाट्यमय कृतीतून गांधी विरुद्ध गांधी नाटकाची सुरुवात आणि शेवट होतो. वर नमूद केल्याप्रमाणे, रचनात्मक बांधणीत, मधल्या अवकाशात, सुरुवात आणि शेवटच्या मधे नाटकाची जडणघडण आणि विस्तार होतो. रचनेच्या अंगाने, पहिल्या दृश्यात दोघे जण गेलेल्या आयुष्याची उजळणी करतात आणि शेवटच्या दृश्यात जे घडले आहे त्याबद्दल बोलतात. पहिल्या दृश्यात, रंगसूचनेद्वारे, गांधीजी आणि हरिलाल यांचा मृत्यू जाहीर होतो. गांधीजी आणि हरिलाल बोलू लागतात, गतकाळाची उजळणी करतात आणि दृश्य न बदलता मणिलाल, देवदास आणि रामदास या तीन इतर व्यक्तिरेखांची ओळख होते. पहिल्या दृश्यात गांधीजी, हरिलाल आणि त्यांची भावंडे यांचा मृत्यूनंतरच्या आयुष्याचा विस्तार होतो असे दिसत असले असले तरी ते ‘जिवंत’ जगात बोलत आहेत हे प्रस्थापित होते. यामागचे एक कारण, जिवंत माणसांच्या नाटकाची संकेत व्यवस्था. आणि, दुसरे कारण, नाटकात ज्या व्यक्तिरेखांचे चलनवलन दाखवले आहे त्या व्यक्तिरेखा नाटकाबाहेरच्या जगात जगलेल्या व्यक्ती, स्थळ आणि घटनांना आधार मानून उभ्या केलेल्या आहेत.

गांधीजी आफ्रिकेतील फिनिक्स आश्रमात असल्यापासून नाटकातील व्यक्तिरेखांचा प्रवास दाखवताना दैनंदिन जीवनातील घटना, माणसांच्या सवयी, सोयी आणि गैरसोयी, जगण्यातली शिस्त आणि बेशिस्त, माणसामाणसातील संवाद आणि विसंवाद अशातून व्यक्तिरेखाचित्रण होते. नाटकाच्या शीर्षकातून नाटक गांधीजींबद्दल आहे असे असले तरी ते फक्त महात्मा असणाऱ्या गांधीजीबद्दल नसून महात्मा-पणाच्या आत दडलेल्या सामान्यपणाबद्दलही आहे. नाटक हरिलाल या गांधीजींच्या मुलाबद्दल आणि कस्तुरबा गांधींबद्दलही आहे. नाटकाची सुरुवात होते तेंव्हा आफ्रिकेतील गांधीजींच्या- वडलांच्या फिनिक्स आश्रमात काम करण्यासाठी हरिलाल आलेला आहे. तो आश्रमात येतो कारण तो परीक्षा नापास झाला आहे. आश्रमात आल्यावर इंग्लडला जाणे कसे महत्वाचे आहे हे सांगण्यातच त्यांचा बराच वेळ जातो. पुढे तो भारतात परत जातो. मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत परत नापास होतो. पुढे इस्लाम धर्म स्वीकारतो आणि परत हिंदू धर्मात प्रवेश करतो. वडलांच्या, गांधीजींच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मुलाचा, हरिलालचा मृत्यू होतो. वडलांच्या मृत्यूसमयी आणि नंतर सारे जग हळहळते तर मुलाच्या मृत्यूच्या वेळी कुणी आप्तस्वकीयही नसतात.
हरिलालच्या आयुष्यातील घटनांना नाट्यरूप देताना त्यांचे व्यक्तिमत्व गांधीजींसारखे नाही, गांधीजींच्या विचारांशी मिळते जुळते नाही किंवा गांधीजींच्या विचारांना पुढे नेणारे नाही याबद्दलची खंत जाणवते किंवा तशी ते जाणवावी अशा तऱ्हेची मांडणी नाटकातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने संवादातून आणि नाट्यात्म कृतीतून झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे इतर व्यक्तिरेखा नाटकात उभ्या राहत असल्या तरी भर मात्र महात्मा गांधींवर आहे हे जाणवते. नाटकातील एका स्वप्नदृश्यात बा त्यांच्या मृत्यूसमयी आपल्या मुलाशी – हरिलालशी बोलताना म्हणतात: “त्यांच्या मांडीवर मरणं ही माझं भाग्य समजते मी. मी भांडले – तंटले. पण अखेर त्यांचं मोठेपण पटून त्यांच्या कामात सामीलही झाले. मनात गोंधळ नको ठेऊस.” (४२, गांधी विरुद्ध गांधी)
गांधी विरुद्ध गांधी हे नाटक गांधीजींच्या जीवनाचा शोध घेणारे असले तरी ते त्यांची किंवा त्यांच्या विरोधकांची राजकीय विचारसरणी समोर ठेवत नाही किंवा त्याबद्दल चर्चा करत नाही. गांधी कुटुंबातील दररोजच्या जगण्यातील व्यवहारावर लक्ष केंद्रित करत मुलाबरोबरच्या नात्यातून कौटुंबिक जगण्यातील वेगवेगळे पेच नाटक मांडते. स्वतःच्या मुलाशी – हरिलालशी असलेल्या अस्वस्थ नातेसंबंधांची वेगवेगळ्या अंगाने उकल करत व्यक्ती म्हणून त्यांच्या स्वतःच्या आणि मुलाच्या चढत्या आणि उतरत्या भाव-भावना आणि विचारांचा ठाव हे नाटक घेते. जगन्मान्य वडलांशी जुळवून घेताना मुलाची- हरिलालची होणारी आंतरिक खळबळ हे नाटक मांडते. स्वतःला सिद्ध करत असताना वडलांशी झालेले मतभेद, फसलेला विवाह, अपयशी राजकीय कृती, विचित्ररित्या केलेले आणि माघारी घेतलेले धर्मांतर आणि नंतरचा दयनीय मृत्यू अशा प्रवासातून हे हरिलालची व्यक्तिरेखा आकार घेते. गांधीजी मूकपणे हे सारे पाहत राहतात. एका बाजूला जगाला मानवी जगण्याबद्दलचे उपदेश देतानाच दुसऱ्या बाजूला अस्वस्थपणे मुलाचा ऱ्हास होताना त्यांना दिसत राहतो. बाप आणि मुळातील दोघांमधील विसंवादी संघर्ष नाटकाचा कोअर आहे.
गांधी विरुद्ध गांधी, अजित दळवी पॉप्युलर प्रकाशन, १९९६.
Comments