भारत आणि भारताबाहेरील जुन्या/दोन-चार हाती फिरलेल्या पुस्तकांच्या दुकानातून मी फिरत असतो. त्यातली बरीच दुकाने बिन उंबऱ्याची, रस्त्याच्या कडेची. अमेरिकेतल्या कोलंबस मधलं ‘कॅरन विक्लिफ बुक्स’ हे आतापर्यंतचं मी पाहिलेलं सर्वात मोठं – छत असलेलं दुकान. शेकडो पुस्तकांच्या या दुकानात मला बहुमोल पुस्तके तर मिळालीच पण बऱ्यापैकी स्वस्तातही मिळाली.
दुकानात काउंटरवर असणाऱ्या स्त्रीने दिलेला मास्क घालून काही तास पुस्तके शोधल्यावर काउंटरवर आलो आणि सवयीप्रमाणे पुस्तकांच्या किंमती कमी होतील काय असं विचारायचं मनात आलं. अर्थात मी ते काही बोलून दाखवलं नव्हतं. पण त्या स्त्रीला ते ‘ऐकू’ गेलं असावं! त्या म्हणाल्या, तुम्ही या पुस्तकांची किंमत ऑनलाईन चेक करा आणि मग ठरवा घ्यायची की नाही! मला हा सुखद धक्का होता. ती पुस्तके बाजूला काढून ठेवली. जेवणाचा ब्रेक घेऊन मी परत पुस्तके पाहायला आलो. त्यावेळी, त्या दुकानाच्या मोठ्या मालकीणबाई – काउंटरवरच्या स्त्रीची आई- कॅरन हजर होत्या. वय- ७९ वर्षे. थोड्या वाकलेल्या पण भारी उत्साही. वेगवेगळ्या कपाटांसमोर जाऊन त्या कपाटातल्या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगायला माझ्या पुढे.

तिथल्या प्रत्येक पुस्तकांवर पुस्तकांची किंमत त्यांच्या हस्ताक्षरात दिलेली आहे. काही पुस्तकांच्या पहिल्या पानावर त्या पुस्तकात आत काय आहे याबद्दलची नोंद आहे. काही ठिकाणी – पुस्तकाच्या आधीच्या मालकाने खुणा केल्या आहेत किंवा दोन-तीन पाने दुमडली आहेत म्हणून त्याची किंमत एवढी-एवढी आहे असेही नोंदवलेले आहे. मला हवीत ती पुस्तके जमविल्यावर त्यांच्या लक्षात आले की माझ्या जवळच्या पुस्तकांचे वजन बऱ्यापैकी होतेय. मग त्यांनी आपल्याकडचा वजन काटा काढला. पुस्तकांच्या गठ्ठ्याचे वजन केले. माझ्या एकूण सामानाचे किती वजन होईल याचा मला अंदाज आला. भारतात परत येण्यासाठी ज्या वजनाच्या सामानाची परवानगी होती त्यात बसतील एवढी पुस्तके घेऊन आलो. अर्थात थोडे वजन जास्तीच भरत होते – जे मी घरी गेल्यावर ऍडजस्ट केले.
कॅरनशी तर मैत्रीच झालीच. पुस्तक निवडताना, पुस्तकाचे बिल करताना, ती बांधताना आमचे तोंड चालूच होते. मी दुकानाबाहेर पडू लागलो तशा त्याही बाहेर आल्या. आम्ही समोरच्या बाकावर परत गप्पा मारत बसलो. गेले चाळीस वर्षे त्या जुन्या पुस्तकांचा व्यवसाय कसा करताहेत, पुस्तके कशी मिळवतात, दुकानाच्या जागा कशा बदलल्या, जुन्या पुस्तकाची किंमत त्या कशी ठरवतात, घरातले कोण-कोण दुकानात येतात (नवरा येण्यात कसा उत्साही नसतो !


(अशाच गप्पा मी आमच्या कोल्हापूरच्या नेताजी कदमांबरोबर गेले अनेक वर्षे- कॉलेजला असल्यापासून मारत आलो आहे. ते तर मला म्हणतातही, तुमच्याकडेच इथली बरीच पुस्तके आहेत!)
तर, बोलता बोलता, रॉबर्ट गॉटलीब या अलीकडे वारलेल्या Knopf आणि द न्यू यॉर्करच्या संपादकांचा विषय निघाला. त्यांच्या लिखाणाबद्दल मला उत्सुकता होती. विशेषकरून, द न्यू यॉर्करचे दोन तीन जुने अंक असतील तर मला हवे होते. पण त्यांच्याकडे दुकानात नव्हते. त्या वेळेपुरता विषय बाजूला पडला होता. पुस्तकांचा गठ्ठा घेऊन मी बाहेर पडलो. त्यांनीही माझ्या समोर दुकान बंद केले होते.

कॅरन विक्लिफ बुक्स मधे मी घेतलेल्या पुस्तकांत राजकीय कारणांसाठी बंदी घातलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे पुस्तक, जगभरातल्या पुस्तकसंग्रह करणाऱ्यांच्या वेडेपणाविषयी पुस्तक आणि एकोणिसाव्या शतकातील सारा बर्नहार्ड या शेक्सपिअरची नाटके करणाऱ्या फ्रेंच रंगभूमीवरील प्रख्यात जगप्रसिद्ध अभिनेत्रींचे Knopf ने प्रकाशित केलेले चरित्र अशी काही पुस्तके आहेत.
दुसऱ्या दिवशी, त्या भागातला आठवडी बाजार होता. जवळपासच्या गावातल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी भाजी-पाला, फळे आणि खाण्याचे पदार्थ विकायला ठेवले होते. सकाळचा नाश्ता बाजारात करावा म्हणून मी लौकरच तिथे पोहोचलो तर या पुस्तकवाल्या कॅरन समोर उभ्या! हॅलो म्हणत भाजीसाठी आणलेल्या पिशवीत हात घालून द न्यू यॉर्कर चे चार अंक त्यांनी काढले आणि तुमच्यासाठी अंक आणलेयेत म्हणत माझ्यासमोर धरले. मला एकदम मस्त वाटले. त्यांनी ऑफर केलेल्या अंकातील दोन अंक मी मी घेतले. आपण इथे परत भेटू असं मनातल्या मनात वाटत होतं म्हणून अंक बरोबर घेऊन आले असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
Comments